करीयर करताना आर्किटेक्टसनी पुस्तकाबाहेर लपलेले ज्ञानही आत्मसात करावे - राजेश पाटील

करीयर करताना आर्किटेक्टसनी पुस्तकाबाहेर लपलेले ज्ञानही आत्मसात करावे - राजेश पाटील

पुणे,दि.०९ :- नव्याने आर्किटेक्ट म्हणून करीयर करणा-या तरूणांनी त्यांचे काम एन्जॉय करावे, आनंदासाठीच काम करावे. हे काम करत असताना समाजाचे, पर्यावरण, निसर्ग साखळी या सारख्या विषयांचेही भान ठेवून त्यात सार्वजनिक हितासाठी सहभाग घ्यावा. पुस्तकात किंवा कागदावर असलेले ज्ञान म्हणजेच पूर्ण ज्ञान नव्हे तर त्या पलिकडेही बरेच लपलेले ज्ञान असून ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रय़त्न करीयरमध्ये करा, असे आवाहन पिंपरी चिचंवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी आज येथे केले. दरम्यान तरूण आर्किटेक्टसना पिंपरी चिंचवड या नव्याने विकसित होत असलेल्या शहरात कामाची चांगली संधी उपलब्ध असून त्याचा फायदा घेण्यासाठी या नव्या शहरात या असे आवाहनही त्यांनी केले.

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्टच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक रंगमंदिराच्या कलादालनात महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे “दी एक्झिट एक्झिबिशन 2022’’ हे  प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन आणि प्रदर्शनातील प्रकल्पांची माहिती देणा-या “दी एक्झिट” या पुस्तकाचे प्रकाशन आयुक्त पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अभय छाजेड, उपाध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, संस्थेचे सचिव जितेंद्र पितळिया, संचालक व आर्किटेक्ट विकास भंडारी, प्राचार्य प्रसन्न देसाई, समन्वयक शेखर गरूड आदी मान्यवर उपस्थित होते.

ओडिशी राज्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना मयूरभंज येथे आलेला अनुभव राजेश पाटील यांनी सांगितला. ते म्हणाले, जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी आहेत. या जिल्हाच्या एका गावात गेलो असता तिथे परदेशी पर्यटक वास्तव्यास असलेले बघायला मिळाले. कुतूहलाने त्याबाबतची माहिती घेताना त्याच गावातील एकाने स्थानिक वस्तूंच्या सहाय्याने उभारलेल्या आणि सजवलेल्या हॉटेलची माहिती मिळाली. हॉटेलची अंतर्गत सजावट स्थानिक कापडाने केलेली होती, भिंती मातीच्या होत्या. सर्व गोष्टी तिथेच उपलब्ध होत्या. पूर्णत: स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेल्या त्या हॉटेलचे दर पंचतारांकित हॉटेल पेक्षा जास्त होते. यावरून मी एक धडा शिकलो की पुस्तक किंवा कागदाच्या बाहेरही लपलेले खूप ज्ञानाचा साठा आहे. तो साठा असलेली माणसे शिकलेली नसली तरी अशा ज्ञानाने समृद्ध असतात. तरूण आर्किटेक्टनी असे बाहेर लपलेले ज्ञानही आत्मसात केले तर करीयर अधिक चांगले होईल.

पदवी घेऊन तुम्ही बाहेर पडाल, पैसे मिळवाल, श्रीमंत व्हाल असे सांगून ते म्हणाले, यापुढे समाजात कोणतेही काम करताना संधी मिळाल्यावर अगोदर नागरीक म्हणून, समाज, पर्यावरण, इकोलॉजी याचाही विचार करा. त्यातील समस्यांचा विचार करून त्यावर उपाय शोधून काढा. असे विचार सुरूवातीपासूनी मनात असतील तर कोणतेही काम करताना अवघड जात नाही. मी शेतकरी कुटुंबातला, भाजी विकायचो पण काही तरी वेगळं करायची इछ्छा होती. सुरूवातीला आव्हान आली. पण त्याला कसं समर्थपणे तोंड द्यायचे हेही शिकलो असल्याने प्रशासकीय सेवत सुरूवातीच्या काळात अनुभव नसतानाही मी पूर, वादळं येतात अशाच भागात काम करू शकलो. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड या नव्याने विकसित होत असलेल्या शहरात काम करण्यासाठी येण्याचे आवाहन केले.

विश्वास कुलकर्णी म्हणाले, सुरूवातीपासूनच आर्किटेक्टचे काम हे अगोदर होते आणि त्यावर अभियंता इमारत उभी करतो ती लोकांसमोर येते. जसे की मुंबईचे वछत्रपती शिवाजी टर्मिनन्स असो की मुंबई महापालिकेची इमारत असो याचे डिझाइन इंग्रजांच्या कोणा आर्किटेक्टने तयार केले होते पण या वस्तू अभियंत्याने साकार केल्याने ते लोकांसमोर आजही आहे. आता आर्किटेक्टचे बॉस म्हणून काम करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. आर्किटेक्टला स्थापत्य अभियंता, स्ट्रक्चरल अभियंता, पर्यावरण अभियंता अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञांच्या टीममध्ये काम करावे लागते. तुम्ही आर्किटेक्ट म्हणून समाजाला द्याल तेवढे किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळते असा आपलाया कामातील इतक्या वर्षाचा अनुभव आहे. असे सांगून त्यांनी तरुण आर्किटेक्ट समोर कामाबद्दलचे सादरीकरणही केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य प्रसन्न देसाई यांनी दी एक्झिट एक्झिबिशन यासह महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. यंदाच्या “दी एक्झिट एक्झिबिशन 2022’’ मध्ये एकूण 75 प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले आहे. त्यात पुण्यातील नदीपात्रातील मेट्रोस्टेशन परिसरातील जागेचे सार्व आजूबाजूच्या जागेचा सार्वजनिक वापर कसा करता येऊ शकतो इथपासून ते डिजिटल इंडिया, डाटा सेंटर, चेतना स्कूल, वन्यजीव पुर्नवसन केंद्र, विद्यार्थ्यांसाठी पुर्नवसन केंद्र, स्केटिंग स्टेडियम अशा विविध संकल्पनांचा समावेश या प्रदर्शनात आहे. हे प्रदर्शन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक रंगमंदिराच्या कला दालनात शनिवार आणि रविवारी बघण्यासाठी खुले रहाणार आहे.