ज्या क्रियेने ईश्वरी तत्व प्रकट होते, तो उत्सव कीर्तन केसरी ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे ;

ज्या क्रियेने ईश्वरी तत्व प्रकट होते, तो उत्सव कीर्तन केसरी ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे ;

पुणे,दि.०३ : - केवळ श्रावण महिन्यातच नव्हे, तर सातत्याने धर्माभिमुख, समाजाभिमुख असलेली कार्य उत्सवांतर्गत केली जातात. ऐक्याचा साधक, उत्साहाचा वर्धक, प्रेमाचा संवर्धक, धर्माचा रक्षक, भावनांचा संरक्षण करणारा असा उत्सव पाच तत्वांवर आधारलेला आहे. ज्या क्रियेने ईश्वरी तत्व प्रकट होते, त्याला उत्सव म्हणतात, असे मत कीर्तनकेसरी ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केले.  

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संत सोपानदेव संस्थान सासवडचे प्रमुख विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी, शांताराम निम्हण, पांडुरंग दातार, दिनकर महाराज वांजळे, ट्रस्टचे माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. दिनांक ६ आॅगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत.

चंद्रकांत महाराज वांजळे म्हणाले, आज ऐक्य फार अवघड झाले आहे. सज्जनांची सक्रियता अत्यंत महत्वाची आहे. विविध उत्सवांमधून ही सज्जनशक्ती एकत्र येते. नैराश्ययुक्त माणूस उत्सवातून अत्यंत उत्साहवर्धक व चैतन्यसंपन्न होतो. आपले बोलणे, पहाणे आणि करणे चांगले असावे, असे जगद््गुरु संत तुकाराम महाराज सांगतात. या तीन गोष्टी चांगल्या असतील, तरच माणूस चांगला राहू शकतो.

ते पुढे म्हणाले, आपण असे काही बोलावे, ज्यातून विठ्ठल प्रकट होऊन डोलेल. शस्त्राचे घाव भरुन निघतात. मात्र, शब्दाचे घाव कधीही भरुन निघत नाहीत. भक्ती, ज्ञान, प्रेम, सत्य म्हणजे विठ्ठल आहे. आपण या सर्वांचे पालन करणे म्हणजे विठ्ठल आहे, असेही त्यांनी सांगितले. ट्रस्टच्या युटयूब, फेसबुक पेजवरुन घरबसल्या आणि प्रत्यक्षपणे गणेश कला क्रीडा मंच येथे प्रत्यक्षपणे पुणेकरांना कीर्तनांचा विनामूल्य आनंद घेता येणार आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.