पुणे महानगरपालिकेचा धायरी येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पुणे महानगरपालिकेचा धायरी येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पुणे,दि.१६:- पुणे शहरातील धायरी रायकर मळा, सर्व्हे. न.७६ येथील सुमारे ५०,००० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर पुणे महानगपालिकेच्या वतीने आज कारवाई करण्यात आली.
या परिसरात प्रथमच जॉ कटर च्या साहाय्याने सहा  मजली चार  इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी व संबंधीत  बांधकाम व्यावसायिकांनी तीव्र विरोध केला. परंतु या विरोधाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी न जुमानता ही कारवाई केली. पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र.२ यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राहुल साळुंके, यांच्या नियंत्रणाखाली उप अभियंता राहुल तिखे, इमारत निरीक्षक संदेश पाटील,कनिष्ठ अभियंता धनंजय खोले, निशिकांत छाफेकर, हेमंत कोळेकर, किरण अहिरराव इत्यादींच्या पथकाने ही कारवाई केली.
या वेळी एक जॉ कटर मशिन, एक जेसीबी व पंधरा कर्मचारी इत्यादींच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.  पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांचा विकास आराखडा अजुन तयार व्हायचा आहे. हा विकास आराखडा तयार करत असताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे . तरी नागरिकांनी कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत. असे आवाहन कार्यकारी अभियंता राहुल साळुंके यांनी नागरिकांना केले.
या वेळी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे व वीस पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.