पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्याकडे खासदार गिरीश बापट यांची मागणी.

पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्याकडे खासदार गिरीश बापट यांची मागणी.

नवी दिल्ली ता.२२ : पुणेकरांची वाढती मागणी विचारात घेता पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे खासदार गिरीश बापट यांनी आज मागणी केली. 
खासदार बापट यांनी सांगितले की पुणे ही भारतातील आठव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था मानली जाते. देशातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न आहे. पुणे शहराच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. बजाज ऑटो, जनरल मोटर्स, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन आणि फोर्स मोटर्स यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपन्यांनी पुणे, महाराष्ट्राजवळ त्यांच्या ग्रीनफिल्ड सुविधा उभारल्या आहेत. पुणे हे शहर इन्फोसिस, टीसीएस आणि कॅपजेमिनी, आयबीएम, रॉकवेल ऑटोमेशन, टेक महिंद्रा इत्यादीसारख्या अनेक नामांकित आयटी कंपन्यांचे घर आहे. तसेच अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रे यांच्या उपस्थितीमुळे पुण्याचे वर्णन "पूर्वेकडील ऑक्सफर्ड" म्हणून केले जाते. हे शहर देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र बनले आहे. त्यामुळे पुण्यातून परदेशात व परदेशातून पुण्यात प्रवास करणाऱ्याची संख्या लक्षणीय आहे. कोविड-19 यापूर्वी पुण्यातून ४ हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती. परंतु सध्या पुण्यातून फक्त एकच आंतरराष्ट्रीय विमान सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना मुंबई व दिल्ली विमानतळावरुन प्रवास करावा लागतो, पर्यायाने त्यांचे आर्थिक नुकसान व वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे पुण्याहून सिंगापूर, बँकॉक, पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, नागरिक व इतर विविध स्थरातून सातत्याने माझ्याकडे मागणी करीत आहे. यासर्व बाबींचा विचार करता, पुण्याहून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची मागणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना यांना केली.