बालगंधर्व रंगमंदिर सारखी वास्तू पुन्हा उभी राहणे शक्य नाही - 'रंगभूमी आणि रंगमंदिर' या परिसंवादातील सुर

बालगंधर्व रंगमंदिर सारखी वास्तू पुन्हा उभी राहणे शक्य नाही - 'रंगभूमी आणि रंगमंदिर' या परिसंवादातील सुर

पुणे,दि.२६ : -एकेकाळी असे म्हटंले जायचे की आशिया खंडात बालगंधर्व रंगमंदिरांसारखे सुसज्ज नाट्यगृह नाही. मात्र आता प्रशासनानेच हे नाट्यगृह पाडण्याचा घाट घातला आहे. या वास्तूचा पुनर्विकास होवू नये अशी सर्व रंगकर्मींची अपेक्षा आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा सारखी बालगंधर्वची अवस्था होवू नये, असे वाटते.  तसेच  बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास झालाच तर एक इंचही जागा व्यावसायिक वापरासाठी न देता याच सारखी हुबेहूब वास्तू येथे उभी राहावी, परंतु बालगंधर्व रंगमंदिर सारखी वास्तू पुन्हा उभी राहणे शक्य नाही असा सूर आज 'रंगभूमी आणि रंगमंदिर' या परिसंवादात निघाला.

बालगंधर्व रंगमंदिरच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवात आज 'रंगभूमी आणि रंगमंदिर' हा  परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अभिनेते माधव अभ्यंकर, महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले, ज्येष्ठ पत्रकार अनिरूद्ध बडवे आणि लोकसत्ता चे संपादक मुकुंद संगोराम आदी सहभागी झाले होते. राजेश दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे आणि बालगंधर्व परिवार चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासह बालगंधर्व परिवाराचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

माधव अभ्यंकर म्हणाले, एकेकाळी आशिया खंडात उत्तम असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा पालिकेचा घाट आहे. ही केवळ वास्तू नाही तर आम्हा कलाकारांचे मंदिर आहे. एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूचा पुनर्विकास करण्याच्या हेतूने पु. ल.देशपांडे यांनी पूर्ण विचारांती उभे केलेले हे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा विचार ही शासनाने करू नये अन्यथा पुण्यातील अति महत्वाच्या वास्तू नामशेष होण्यात बालगंधर्व रंगमंदिराचा ही समावेश अटळ आहे.

शुभांगी दामले म्हणाल्या, बालगंधर्वचा पुनर्विकास करायचा असेल तर फक्त एकाच थिएटर बांधा आणी त्याचा परिसर ही कलामय करा. त्याजागी वेगेवेगळ्या आसन क्षमतेची तीन नाट्यगृह उभी करण्याची गरज नाही. तसेच एक इंचही जागा व्यावसायिक वापरासाठी न देता बालगंधर्व भूमी सारखी हुबेहूब वास्तू येथे उभी राहावी.

मुकूंद सांगोराम म्हणाले, बालगंधर्वच्या जागी नवीन नाट्यगृह तयार होणार आहे. मेट्रोच्या पार्किंसाठी ही जागा वापरण्याचा पालिकेचा मानस आहे. मेट्रो येथून जाणार असून येथे तंबोऱ्यांच्या आकाराचा पूल बांधला जाणार आहे. म्हणजे नाट्यगृह पाडून त्यांना येथे फक्त तंबोरा ठेवायचा आहे.  या वास्तूचा पुनर्विकास झाला तरी त्याची अवस्था पुन्हा यशवंतराव नाट्यगृहा सारखी होवू नये म्हणजे झालं. यशवंतराव नाट्यगृहाचा पूर्णविकास गेली पाच वर्ष सुरू आहे. तेथे नाटक करूच नये अशी अवस्था आहे. अण्णाभाऊ साठे मधील साऊंड सिस्टिम भरदिवसा चोरीला गेली. हा पांढरा हत्ती नाही ही पुण्याची गरज आहे.

अनिरूद्ध बडवे यांनी थोडी वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले, सांगली ही नाट्य पंढरी असूनही अजूनही शासनाने तेथील नाट्यगृहांना ऐतिहासिक वास्तूचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराला देखील तो दर्जा देण्यात आलेला नाही. बालगंधर्व रंगभूमीची वास्तू मोडकळीस आली असेल तर त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे. त्यामुळे नवीन नाट्य कर्मींना चांगले व्यासपीठ मिळेल. अन् पुन्हा येथे नाटकाचे प्रयोग रंगातील अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, महोत्सवात आज महिलांसाठी खास लावणी महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लावणी क्षेत्रातील जुने तमाशा कलावंत तसेच नवीन पिढीतील काही कलाकारांचा बालगंधर्व पुरस्काराने सन्मान करण्यात आला.यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ने परफॉर्मन्स केला.निवेदन सतीश वायदंडे यांनी केले तर गायिका स्वाती शिंदे होत्या.

तसेच मराठी बिग बॉस च्या गमती जमती या कार्यक्रमात तृप्ती देसाई, मीरा जगन्नाथ, डॉ. उत्कर्ष शिंदे, सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, नेहा शितोळे, माधव देवचक्के, अभिजित बिचुकले,सोनाली पाटील,आदी कलाकार सहभागी झाले होते.जितेंद्र वाईकर आणि अश्विनी धायगुडे-कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले.