पालखी सोहळा मार्गावर खाद्यपदार्थ वाटप व विक्री करण्यासाठी महानगरपालिकेचा परवाना असणे अनिवार्य

पालखी सोहळा मार्गावर खाद्यपदार्थ वाटप व विक्री करण्यासाठी महानगरपालिकेचा परवाना असणे अनिवार्य

पिंपरी चिंचवड,दि. १८:- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पालखी मुक्काम आणि मार्गावर विविध वस्तू, खाद्यपदार्थ वाटप अथवा विक्री करण्यासाठी महानगरपालिकेचा परवाना असणे अनिवार्य आहे, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन अनुक्रमे दि. २१ जून आणि २२ जून २०२२ रोजी महापालिका कार्यक्षेत्रात होणार  आहे.  त्या अनुषंगाने  पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  शहरामध्ये दि. १९ जून ते दि २२ जून या दरम्यान होणाऱ्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मुक्काम आणि मार्गावर विविध वस्तू, खाद्यपदार्थ वाटप करण्यासाठी दुकान किंवा स्टॉल सुरु करण्यासाठी तात्पुरता परवाना देण्यात येणार आहे.
हा परवाना ऑनलाईन पद्धतीने काढता येणार असून यासाठी नागरिकांना https://bit.ly/PCMC या लिंकवर फॉर्म भरून परवानगी घेणे आवश्यक आहे.  यामध्ये खालील माहिती असणे गरजेचे आहे.  वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, दुकान किंवा स्टॉल ज्या ठिकाणी उभारायचा आहे तेथील पत्ता, जवळची खूण, दुकान वैयक्तिक स्तरावर अथवा संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहे त्याबाबत माहिती, दुकानाचे आकारमान, दुकान किंवा स्टॉल सुरु करण्याचे उद्दिष्ट सेवा पुरविणे अथवा व्यवसाय करणे याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.  तसेच ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये दुकान किंवा स्टॉल उभा करायचा आहे तेथील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील हा परवाना घेता येणार आहे.  ही परवानगी घेण्याबाबत काही अडचण उद्भवल्यास बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड (९९२२५०१७६३) यांच्याशी संपर्क साधावा.
सर्व विक्रेत्यांनी महानगरपालिकेने पिण्यासाठी पुरविलेले किंवा उपलब्ध करुन दिलेलेच पाणी वापरावे.  स्वच्छ भांड्यांमध्येच पिण्याच्या पाण्याची साठवण करावी.  तयार केलेले खाद्यपदार्थ बंद कपाटात किंवा डास, किंवा माशी प्रतिबंधक जाळीने झाकून ठेवून धुळीपासून व माशांपासून संरक्षण करावे.  हॉटेल, व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छतेच्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे. पदार्थ तयार करताना स्वच्छ जागा, स्वच्छ हात, स्वच्छ भांडी आणि शुध्द पाणी या तत्वांचा वापर करावा.
पालखी सोहळ्यादरम्यान शहरात उभारण्यात येणाऱ्या सर्व दुकानधारक, स्टॉलधारक आणि अन्नदात्यांनी महापालिकेची परवानगी घेऊन दुकान अथवा स्टॉल उभारुन खाद्यपदार्थ (मेवा, मिठाई, थंड पेय, चहा, फळे, पाणी) वितरीत करावेत तसे न आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.