विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’

विधान परिषदेच्या निकालानंतर  एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’

मुंबई,दि.२१:- विधान परिषदेच्या निकालानंतर  एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी यश आलेलं नाही.असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही.एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी विधान परिषदेचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.
मतं फुटली…
शिवसेनेचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यसभेपेक्षाही दहा मतं अधिक मिळाल्याचं उघड झालं असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. आमश्या पाडवी आणि आहिर वगळता कोणताही नेता प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि १३ आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढलीय.