'भाईंदर-वसई मेट्रो तयार करा' - आ. हितेंद्र ठाकूर यांची MMRDA कडे मागणी

'भाईंदर-वसई मेट्रो तयार करा' - आ. हितेंद्र ठाकूर यांची MMRDA कडे मागणी

मुंबई,दि.०७:-गेल्या काही वर्षांत वाढलेली वसई-विरार पट्ट्यातील लोकसंख्या विचारात घेऊन वसई ते भाईंदर मेट्रो सुरू करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. याबाबतचं एक पत्र त्यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला म्हणजेच MMRDA ला लिहिलं आहे. या प्रकरणी त्यांनी MMRDA चे अतिरिक्त महानगर आयुक्त के. एच. गोविंदराज यांची भेट घेतली. या प्रकरणाची व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश आता MMRDA ने दिले आहेत.

वसई-विरार पट्ट्यातून लाखो नागरिक मुंबई महानगर क्षेत्रात दर दिवशी कामासाठी येतात. त्यांना प्रचंड गैरसोय आणि त्रास सहन करावा लागतो. सध्या मुंबई मेट्रोचं कारशेड भाईंदरच्या उत्तन येथील बोस मैदानात उभारलं जात आहे. याच बांधकामाचा भाग म्हणून वसई-भाईंदर या दरम्यान मेट्रो मार्ग बांधावा, अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. त्याचबरोबर नायगाव-भाईंदर यादरम्यान असलेल्या खाडीवरील पुलाच्या बांधकामालाही प्राधान्य द्यावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

MMRDA चे महानगरीय आयुक्त एसआरव्ही श्रीनिवास यांना पाठवलेल्या काही पत्रांमध्ये ठाकूर यांनी वसई तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाबद्दलही सूचना केल्या आहेत. नायगाव-भाईंदर खाडी पूल मार्गी लागल्यास महामार्गावरचा ताण कमी होईल, त्याचप्रमाणे पाणजू गावातील लोकांना बोटीवर अवलंबून राहावं लागणार नाही, असंही ठाकूर म्हणाले.

त्याशिवाय नायगाव पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल, सुर्या धरणाचं पाणी तालुक्यात वळवणे, अलिबाग-विरार मल्टिमोडल प्रकल्प कोकण द्रुतगती महामार्गाशी जोडणे, जिल्ह्यात चार ठिकाणी रेल्वे मार्गांवर पूल बांधणे आणि वसई तालुक्यात ३६ किलोमीटरचा ४० मीटर रुंद रिंग रोड बांधणे, अशा प्रकल्पांचा पाठपुरावाही ठाकूर यांनी केला आहे.

वसई-विरारमधून लाखो प्रवासी रोज मुंबईत जातात. तसंच या भागाची लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या भागात पायाभूत सुविधा प्रकल्पांचं जाळं निर्माण होण्याची गरज आहे. त्या उद्देशानेच ही पत्रं पाठवल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीला आमदार क्षितिज ठाकूर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. वसई ते भाईंदर यादरम्यान मेट्रो मार्गाचा पर्याय उपलब्ध झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. याशिवाय नायगाव ते भाईंदर येथील खाडीवर उड्डाणपुल उभारल्यास सुकर प्रवासासह नागरिकांच्या वेळेची बचत होईल, असे  क्षितिज ठाकूर म्हणाले.