शुक्रतारा या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल यांचा ‘अरुण दाते कला सन्मान’ने गौरव

शुक्रतारा या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल यांचा ‘अरुण दाते कला सन्मान’ने गौरव

पुणे दि.१२ : -अतुल अरुण दाते व अभय गाडगीळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शुक्रतारा’ या सांगीतिक कार्यक्रमात आज सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा यावर्षीच्या अरुण दाते कला सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. रामुभैय्या दाते स्मृती प्रतिष्ठान व पी एन गाडगीळ एक्सक्लुझिव्ह - नळ स्टॉप यांच्या वतीने ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे यांच्या हस्ते कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभय गाडगीळ, दीपा गाडगीळ, मंजु अतुल दाते आदी उपस्थित होते.

याआधी पी एन गाडगीळ एक्सक्लुझिव्ह यांच्या नळ स्टॉप येथील दालनामध्ये ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांचा काल (१० मे, २०२३) रोजी अरुण दाते कला सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

सदर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, यंदा हा पुरस्कार अरुण दाते यांच्या ८९ व्या जन्मदिनाचे औचित्य साधत, त्यांच्यासोबत अनेक वर्षे सहगायन केलेल्या अनुराधा पौडवाल व अनुराधा मराठे या दोन्ही गायिकांना देण्यात आला. सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या, "अरुण दाते कायम वडिलांप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले. आजवर अनेक पुरस्कार मिळाले पण आज त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. अरुण दाते त्यांच्या आवाजाच्या रूपात, संगीताच्या रुपात आजही आपल्या सर्वांमध्ये आहेत. त्यांचा मुलगा अतुल दाते आपल्या वडिलांच्या आठवणी तितक्याच ग्रेसफुली सर्वांसमोर आणतोय ही मोठी गोष्ट आहे. अतुल दाते यांनी आपल्या वडिलांचे संगीत खऱ्या अर्थाने जिवंत ठेवले आहे."

माझ्या सास-यांना माझ्या गाण्याचे खूप कौतुक होते आणि मी आशाताईंसोबत गावे ही तीव्र इच्छा देखील. इतरांच गाणं लग्नानंतर बंद होतं माझं सुरू झालं. अरुण दातेंनी मला नेहमीच खंबीर साथ दिली. माझे सासरे गेले आणि त्यानंतर पंडित हदयनाथ मंगेशकर यांचा आशाताईं सोबत गाणं गाण्यासाठी मला फोन आला. पण ज्या दिवशी रेकॉर्डिंग होणार होतं त्या दिवशी माझ्या सासर्यांचा तेरावा होता म्हणून मी नाही म्हणाले. त्यावेळी माझ्या सासुबाईंनी ही तुझ्या सास-यांची इच्छा होती आणि तू ती पूर्ण कर असे म्हणत मला गायला तयार केलं, अशी आठवण पौडवाल यांनी सांगितली.

त्या पुढे म्हणाल्या, "जेंव्हा मी अरूदादां सोबत शुक्रताराचे कार्यक्रम करायचे तेव्हा 'दिलं है की मानता नहीं...' आणि 'आशिकी या चित्रपटातील गाणी हिट होती आणि मला या गाण्यांसाठी रसिकांकडून फर्माईश यायची तेव्हा अरुण दाते नेहमी म्हणायचे अगं गाणं हिट आहे तर मग गा ना... त्यांनी नेहमीच मला खंबीर साथ दिली." यांनतर पौडवाल यांनी 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मैं आना...' व ' रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना...' ही गाणी सादर केले.

बाबा सुरुवातीला अनेक नावाने कार्यक्रम करायचे तेव्हा तुमचे 'शुक्रतारा हे गाणे इतके लोकप्रिय आहे तुम्ही याच नावाने कार्यक्रम करा असे अनुराधा पौडवाल यांनीच सुचविले होते. यानंतर अरुण दाते यांनी आपला कार्यक्रम  शुक्रतारा या नावाने सुरू केला. अशी आठवण अतुल दाते यांनी सांगितली.

पुरस्काराला उत्तर देताना अनुराधा मराठे म्हणाल्या, “अरुण दातेंसारख्या लोकप्रिय गायकाने मला सहगायिका म्हणून स्वीकारणे हा माझा सन्मान होता असे मी मानते. मी लहाणपणीपासून त्यांची गाणी ऐकत आले, त्यांच्याशी आपली भेट व्हावी ही माझी इच्छा पुढे पूर्ण झाली शिवाय देश परदेशातील कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत गाता आलं, त्यांच्यासारख्या कलाकाराचा दीर्घ सहवास लाभला. अरुण दाते हे एक दिलदार व्यक्तीमत्त्व होतं. यांना सहकलाकारांची कदर होती, सहकलाकारांचे तोंड भरून कौतुक ते करायचे, खूप कमी जण असे असतात त्यात अरुण दाते हे होते. त्यांनी आम्हा प्रत्येक सहकलाकाराला त्यांच्या समान दर्जाने वागवलं. कुठेही जायचे असू आम्ही सर्वच जण एकत्र जायचो, मी मोठा कलाकार आहे, मी आधी जाणार, वेगळा जाणार हे त्यांच्या ठायी नव्हते. ते खाण्याचे शौकीन होते आणि प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेण्याची त्यांची वृत्ती होती.”    

यानंतर स्व. अरुण दाते यांच्या अजरामर मराठी गीतांचा ‘शुक्रतारा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध गायक सारंग पडळकर, श्रीरंग भावे, सुप्रसिद्ध गायिका पल्लवी पारगांवकर, वर्षा जोशी व अंजली मराठे यांनी गीते प्रस्तुत केली. तर प्रसन्न बाम, अमित कुंटे, अभय इंगळे व केदार परांजपे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन हे सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुश्री फडणीस यांनी केले तर स्वतः अतुल अरुण दाते यांनी उपस्थितांशी संवाद साधत अरुण दाते यांच्या आठवणींना उजाळा दिला.  सायली सोनटक्के यांनी स्क्रीन व्यवस्था, तर प्रशांत कांबळे यांनी ध्वनी व्यवस्था पाहिली. ऋचा थत्ते यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Shakti Zunzar. To Get Updates on Mobile, Download the Shakti Zunzar Mobile App for Android.


शक्ती झुंजार आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी

 Telegram

Whatsapp 

Facebook 

YouTube Channel

आम्हाला जॉईन करा तसेच, आमच्याआजच  Subscribe करा