इरई नदीच्या खोलीकरनावरून अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर ताशेरे ओढले

इरई नदीच्या खोलीकरनावरून अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर ताशेरे ओढले

चंद्रपूर,दि.३०: - इरई नदीच्या खोलीकरनावरून राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. कुठले काम प्राथमिकतेने करायला हवे, त्यासाठीचे योग्य नियोजन हे संबंधित मंत्र्यांनी करायला हवे होते. मशिनमध्ये डिझेल भरायला पैसे नव्हते तर खनिज विकास निधीतून दोनतीन कोटी रुपये पुरवून हे काम करता आले असते, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना समजायला हवं' -

अजित पवार हे जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, इरई नदीच्या खोलीकरणबाबत आपण उपमुख्यमंत्री असताना खासदार बाळू धानोरकर यांच्या सूचनेनुसार बैठक लावली होती. त्यासाठी विदर्भ पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागातील उपकरणे वापरून हे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, या कामासाठी वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठीही पैसे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. ज्या पद्धतीने हे काम व्हायला हवे होते ते झाले नाही. ही बाब असती तर नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तीन ते पाच टक्के निधी खर्च करण्यास मान्यता असते, कींवा खनिज विकास निधीतून दोनचार कोटी खर्च सहज करता येऊ शकला असता. कुठल्या कामाला प्राथमिकता द्यायची ही बाब प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना समजायला हवं, असं म्हणत त्यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

मनपाचे वरातीमागून घोडे -

वास्तविक आधी नाल्या आणि भूमिगत मलनिस्सारण नलिका केल्यानंतर त्यावर रस्ता तयार करायचा असतो. मात्र, चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी काँक्रीटीकरण केल्यावर हे काम सुरू आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या प्रकारची स्वच्छता हवी ती शहरात नाही. विकासाचे हे धोरणंच चुकीचे आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

'टोलवाटोलवी नको नदीलगत अतिक्रमण काढा' -

पूरग्रस्त भागाची पाहणी करताना लक्षात आले की नदीच्या अगदी जवळ अतिक्रमण करून घरे बांधण्यात आलीत. तर मोठ्या प्रमाणात नदीच्या लागत प्लॉट पाडण्याचे काम सुरू आहे. हे गैर आहे. पूर आपल्याकडे येत नसून आपण पुराकडे जात आहोत. याबाबत मी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. आता टोलवाटोलवी नको थेट अशा प्रकरणांत कारवाई करा, असेही अजित पवारांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण -

पडोली रेल्वे पुलापासून तर चोराळा पुलापर्यंत साडेसात किलोमीटर लांबी असलेल्या इरई नदीचे खोलीकरण, गाळ उपसा करण्यात येणार होता. यासाठी 6 कोटी रुपयांचा निधी लागणार होता. यातून पाच लाख क्यूबिक टन इतका गाळ उपसण्यात येणार होता. त्यानंतर संपूर्ण खोलीकरण करण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला. पाटबंधारे विभागातील यांत्रिकी उपविभागाच्या माध्यमातून हे सर्व काम होणार होतं. यासाठी याच विभागातील मोठमोठ्या मशिन्स नागपूर आणि अमरावती येथून बोलाविण्यात आल्या. 4 एप्रिलला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या खोलीकरणाच्या कामाचे थाटात उद्गाटन करण्यात आलं. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत हे काम चालणार होते. मात्र, प्रत्यक्षात 10 दिवस हे काम चालले आणि केवळ 100 फूट इतक्या लांबीचाच गाळ उपसा करता आला. मशिन्समध्ये जितके डिझेल होते ते संपले आणि हे काम बंद पडले.