तरुणीचा विनयभंग करून तिला रिक्षासह फरफटत नेणाऱ्या आरोपी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात, व्हिडीओ व्हायरल!

तरुणीचा विनयभंग करून तिला रिक्षासह फरफटत नेणाऱ्या आरोपी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात, व्हिडीओ व्हायरल!

ठाणे,दि.१५ :- ठाणे रेल्वे स्थानक येथील एका २१ वर्षीय मुलीचा वियनभंग करून तिला फरफटत नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस स्थानकात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर ठाणे  पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला मुंबई येथील दिघा भागातून अटक केली आहे. काटीकादाला विरांगनेलू (३६) असे त्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. सीसीटीव्ही, आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी काटीकादाला अटक केली आहे.पिडीत तरूणी ही ठाण्यात राहत असून ती ११ वी मध्ये ठाण्यातील एका महाविद्यालयात शिकते. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ती बाजारपेठेतून पायी जात होती. त्याचवेळी एक रिक्षा चालकही त्याठिकाणी होता. त्याने तरूणीकडे पाहून अश्लील हावभाव करत शेरेबाजी केली. तरूणीने धाडस दाखवित या रिक्षा चालकाला जाब विचारला. त्यावेळेस रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षात बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तरूणीने त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता रिक्षा चालकाने रिक्षा सुरु केली. तसेच त्याने तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले. तरुणीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्तात जखमी होऊन पडली. त्यानंतर रिक्षा चालक स्थानकाच्या दिशेने फरार झाला.पीडित तरूणी महाविद्यालयातून परतल्यानंतर तिने याप्रकरणाची तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीच्या आधारे रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. ठाणेनगर पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी तीन वेगवेगळी पथके तैनात केली होती. तसेच खबऱ्यांचे जाळे पसरविले. पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण याचा आधार घेतला. त्यावेळेस ही रिक्षा नवी मुंबई येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर खबऱ्यांकडून माहिती घेतली असता, ही रिक्षा दिघा येथे राहणाऱ्या काटीकादाला याची असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला दिघा येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली.