ऑनलाइन तीनपत्ती जुगारा मध्ये हरल्याने घरफोडी करणारा आरोपी 24 तासांच्या आत चतु:श्रृंगी पोलिसांच्या जाळ्यात, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑनलाइन तीनपत्ती जुगारा मध्ये हरल्याने घरफोडी करणारा आरोपी 24 तासांच्या आत चतु:श्रृंगी पोलिसांच्या जाळ्यात, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे,दि.,२१. (शक्ति झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) :-स्पायरस कॉलेज, औंध रोड येथे घरफोडी करणाऱ्या आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून २७ लाख ५० हजार रुपयांचे ५५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीने ऑनलाईन तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घरफोडीचा प्रकार १८ ऑगस्ट रोजी औंध परिसरात घडला होता.
मनीष जीवनलाल राय (वय-२९ रा. आऊट हाऊस, कोहिनुर प्लॅनेट, सांगवी रोड, पुणे मुळ रा. गाव खमतारा, ता. बडवारा, जि. कटणी, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्र्यंबकराव तुळशीराम पाटील (वय-७५ रा. स्पायरस शाळेजवळ, सांगवी रोड, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पाटील यांचा फटिलायझर निर्मितीचा व्यवसाय  असून त्यांनी त्यांच्या बंगल्यातून ११ लाख रुपये रोख रक्कम व ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दिली होती.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करुन तपास करुन मनिष राय याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान मनिष राय याला मोबाईल फोनवर ऑनलाईन तीनपत्ती खेळण्याचा नाद असून त्याने पैसे हरल्याने चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ११ लाख रुपये ऑनलाईन तीन पत्ती खेळात हरल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी तपास केला असता त्याने ११ लाख रुपये ऑनलाईन तीनपत्ती खेळात हरल्याचे त्याच्या बँक स्टेटमेंट वरून निष्पन्न झाले. आरोपीकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी २७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ शशिकांत बोराटे (, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे,
पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके, पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे, किशोर दुशिंग,
बाबा दांगडे, श्रीधर शिर्के, इरफान मोमीन, आशिष निमसे, सुधीर माने, प्रदीप खरात, सुधिर अहिवळे, विशाल शिर्के,
तेजस चोपडे यांच्या पथकाने केली.