
पुणे,दि.२७ :- संपूर्ण महाराष्ट्रातून काही दिवसांपूर्वी व्यवहारातून गायब झालेल्या २ हजाराच्या नोटा पुन्हा एकदा बाजारपेठेत अवतरल्या आहेत.ग्राहकही बँकेत नोटा बदलून घेण्याऐवजी व्यवहारात २ हजारच्या नोट देणे पसंत करीत आहेत. यामुळे पेट्रोलपंपापासून ते किराणा व इतर दुकानापर्यंत दररोज २ कोटी मुल्याच्या नोटा चलनात येत असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे.
व्यापाऱ्यांना नकली नोटांची भीती
२ हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरनंतर व्यवहारातून बाद होणार आहेत. तोपर्यंत या नोटा व्यवहारात चालणार आहेत. यामुळे व्यापारी नोटा स्वीकारत आहेत. यास काही व्यापारी अपवादही आहेत. ते नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. असली की नकली २ हजारची नोट तपासणीसाठी त्यांच्याकडे मशिन नाही, २ हजारची एखादी नोट नकली आली तर नंतर कोण भरून देणार, अशी कारणे व्यापारी सांगत आहेत. मात्र, नेहमीच्या ओळखीच्या ग्राहकांकडून नोटा ते स्वीकारत आहेत. काही व्यापारी आधारकार्डची झेरॉक्स मागत असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांमध्ये नकली नोटांविषयी भीती पाहण्यास मिळाली.
काही बँका मागताहेत आधार, पॅन कार्ड
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक व आदी राष्ट्रीयीकृत बँकांचा अपवाद वगळता, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व अन्य बँकेत २ हजारची नोट बदलून देण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड मागताना दिसून येत आहे.